कापूरहोळ वार्ताहर
वर्वे तालुका भोर येथील उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ पासून चालू आहे. गेली १० ते १५ वर्षांपासून शाळा प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये शाळेच्या जमिनीवरून वाद सुरू आहे. दिनांक ९ रोजी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर काही गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेतून घरी हाकलून दिले. आणि वर्ग खोल्यांना टाळे ठोकले. या प्रकरामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत माहिती अशी की ,उल्हास शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल वरवे ही शाळा इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत असून शाळेत ३१६ विद्यार्थ्यां व १५ कर्मचारी आहेत. गावच्या देवस्थानने शिक्षण संस्थेलां १५५ गुंठे चां सातबारा करून दिलेला आहे. पैकी ६०गुंठे जागा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरत असल्याचा दावा शिक्षण संस्थेने केला आहे. शाळेच्या नावावर एकूण १५५ गुंठे जागा असून पैकी ६० गुंठे जागा शालेय इमारत व मैदानासाठी वापरात असून उर्वरित ९५ गुंठे जमीन शाळा वापरत नाही. भैरवनाथ देवसंस्थानाने ही जागा संस्थेला बक्षीस पत्र करून दिलेली आहे. पण वापरात नसल्याली ९५ गुंठे जागा देवसंस्थान ट्रस्टच्या नावावर परत करण्यासाठी गेल्या १५ ते २० वर्षांपासून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित प्रकरण आहे. यावरुनच संस्था आणि गावकरी यांच्यात वाद सुरू झाला असून गावकऱ्यांनी या प्रकरणी रोष व्यक्त करीत शाळेला कुलूप लावले. गेल्या अनेक वर्षांपासून ३० गुंठे जमीन शाळेने स्वःताच्या नावे करुन उर्वरित जमिन ट्रस्टच्या नावे करावी, अशी मागणी गावकऱ्यांची आहे. शाळेच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने सदर कृती करावी लागली असे नागरिक सांगत आहेत.तर शालेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास बांदल यांनी सांगितले की धर्मदाय कार्यालयात ट्रस्ट आणि गावातील ग्रामस्थ कागदोपत्री पूर्तता करीत नाहीत म्हणून धर्मदाय आयुक्त यांचेकडे ही बाब प्रलंबित आहे.जागा परत देनेस आम्ही तयार आहोत.
आक्रमक निर्णयाची झळ विद्यार्थ्यांना
सदर जागेवरून शाळा आणि वरवे गावातील ग्रामस्थ आणि ट्रस्ट यांच्यात वाद चांगलाच उफाळून आला असून या शाळेत आसपासच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा बंद केलेल्या आक्रमक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे वादाची झळ विद्यार्थ्यांना का? असा प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहे.
राजकीय प्रेरित हेतूने काही ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहेत. शाळेची बदनामी करण्याचे काम हेतू पूर्सर केलं जात आहे. याबाबत आम्हाला नाहक त्रास दिलेला जात आहे. होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला सर्वस्वी गावकरी जबाबदार असतील.
विलास बांदल, संस्थेचे अध्यक्ष