भोर
पुणे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी (ता. वाई) येथील श्री काळूबाई देवीची यात्रा दिनांक १२ जानेवारी पासून चालू होत आहे. हायात्रा उत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. यात्रेचा मुख्य दिवस १३ जानेवारी असून, यात्रा उत्सवाची तयारी प्रशासन आणि उत्सव समितीने सुरू केली आहे अशी माहिती मांढरदेव देवस्थान विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.
राज्यभरातील लाखो भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री काळुबाई देवीची यात्रा दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. यावर्षी १२ जानेवारीला देवीचा जागर चालू होऊन मुख्य दिवस १३ जानेवारी असणार आहे.या काळात विविध भागातून लाखोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कापूरहोळ- भोर आंबाडे मार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंबाडखिंड घाटमार्गे भाविकांची गर्दी होत असते. कापूरहोळ ते मांढरदेव रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने जागोजागी वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.वाहन चालकांकडून हा रस्ता काळात वाहतुकीस खुला रहाणार का?अशी शंका वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला कापूरहोळ भोर मांढरदेव मार्गे जाणारे भाविकांची गर्दी मागील वर्षाच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने मांढरदेवी यात्रा काळासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून दिले तरच भाविक भक्तांना आंबाडखिंड घाटमार्गे काळूबाई देवीला जाणे सोईस्कर ठरणार आहे. अन्यथा भाविकांना लांब पल्यावरून वाईमार्गे देवीच्या यात्रेला आर्थिक नुकसान सहन करून जावे लागणार आहे