कर्नाटक मधून मुंबईत जाणारा अवैध गुटखा पकडला

Rajtorannews

राजगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह साडे एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त


कापूरहोळ
कर्नाटक मधून मुंबईत जाणारा अवैध गुटखा राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर कामथडी (ता. भोर) गावच्या हद्दीत आज शनिवारी (दि. २८ डिसेंबर) दुपारी एकच्या दरम्यान राजगड पोलिसांनी सापळा रचून पकडला. अवैध गुटखा वाहतूक करणारा अशोक लेलंड कंपनीचा आयशर ट्रक नंबर एम. एच. ०५ ई. एल. ९७८८ आहे. यामध्ये राज कोल्हापुरी नावाच्या गुटख्याची २१ पोती असून त्याची अंदाजे किँमत ९ लाख ४५ हजार रुपये एक मोबाईल किंमत रुपये 5 हजार आणि १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण २१ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू माल, जन आरोग्यास हानीकारक आहे व त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे याची पुर्णपणे माहीती असताना निपाणी कर्नाटक येथुन गाडीत भरून घेऊन विनोद (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यास देण्याकरीता ठाणे येथे घेऊन जात असताना मिळून आला आहे.म्हणून राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश कुंभार यांनी राजगड पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अवैध्य गुटखा वाहतूक करणारा एक ट्रक पुणे- सातारा महामार्गावरून राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे. यांनतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार यांना याबाबत सूचना दिल्या. या पथकाने सापळा रचत कामथडी (ता. भोर) हद्दीत या ट्रकसह चालक इब्राहिम कुशनुरू (अंदाजे वय ३३ वर्ष, रा. उल्हासनगर, मुंबई) याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने सदरचा माल हा निपाणी कर्नाटक वरून मुंबई कडे घेऊन जात असल्याचे सांगितले.याबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस करीत आहेत.
To Top